छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः वडगाव कोल्हाटी परिसरातील सिडकोच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या महिलेवर वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती चव्हाण रा. वडगाव कोल्हाटी असे आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिडकोच्या सहाय्यक वसाहत अधिकारी स्वाती पाटील यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 3 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास स्वाती पाटील वडगाव कोल्हाटी येथील सिडकोच्या नऊ हेक्टर 64 आर संपादित जागेची पाहणी करत असताना आरोपी महिला भारती चव्हाण हिने 2000 चौरस मीटर शासकीय जागेवर अतिक्रमण करून मिरची पिकाची लागवड केल्याचे आढळून आले. सदर जागेबाबत भारती चव्हाण यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. मात्र न्यायालयाने सिडकोस मनाई हुकूम दिलेला नाही. एमआयडीसी वाळूज पोलीस पुढील तपास करीत आहेत.
महिला सुरक्षारक्षकाला मारहाण
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः दवाखान्यात प्रवेश देण्याच्या कारणावरून महिला सिक्युरिटी गार्डला बेदम मरण केल्याची घटना एमजीएम हॉस्पिटल ओपीडी गेट जवळ घडली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपना खंडारे तिची बहीण व बहिणीचा नवरा अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी राजश्री सुधाकर बोईने रा.कैलास नगर गल्ली नंबर 5 यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार फिर्यादी एमजीएम हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. 8 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास फिर्यादी गेट जवळ ड्युटी करीत असताना आरोपी सपना खंदारे व इतर आरोपी आले. दवाखान्यात जाऊ द्या म्हणून फिर्यादींना सांगितले.पेशंटला भेटायचे नंतर पास दाखवा असे फिर्यादी म्हणाले असता आरोपींनी तू आम्हाला ओळखत नाही का, असे म्हणून वाद घातला. आरोपींनी मारहाण करीत फिर्यादीची डोके फरशीवर आपटून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिल. सिडको पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सनी सेंटरजवळ महिलेवर चाकू हल्ला
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः धुणी भांडी करणाऱ्या महिलेवर चाकूहल्ला केल्याची घटना सनी सेंटर समोर घडली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ मोगल पवार रा.लाखसुरेगाव ता. वैजापूर असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी व आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहे. फिर्यादी महिला बहिणीसोबत धुणी भांडी करण्याचे काम करते. 9 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सनी सेंटर येथील देशी दारूच्या दुकानासमोर आली होती. आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. बहिणीला शिव्या का देता, असे असे विचारणा करीत असताना आरोपीने हातावर चाकू मारून जखमी केले. सिडको पोलीस पुढील तपास करीत आहेत.















